'कुडाळ मान्सून रन २५' चं लक्षवेधी आयोजन

Edited by:
Published on: July 13, 2025 15:23 PM
views 100  views

कुडाळ :  कुडाळ हे असे शहर आहे की ज्या शहरात क्रिडा, नाट्य, साहित्य, उद्योग अशा विविध क्षेत्रात सातत्याने काही मंडळी कार्यरत असते. यापैकीच एक डाॅ. जी. टी. राणे. गेल्या वर्षापासून त्यांनी आपल्या ह्रदयाचे आरोग्य ठिक रहावे यासाठी मान्सून रन २०२४ चे आयोजन केले होते. तो उपक्रम कमालीचा यशस्वी झाला. विविध वयोगटातील सहभागीना पाच, दहा, पंधरा, सतरा की. मी रन करण्यासाठी नियोजन होते. गतवर्षी तब्बल साडेसातशे जणांनी सहभाग घेतला होता. 

गेल्यावर्षी पेक्षा यावर्षीचे नियोजन हटके होते. या मान्सून रनला झेंडा दाखवण्यासाठी मा. जिल्हाधिकारी अनिल पाटील साहेब, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर, कुडाळ औधोगिक वसाहतीचे अविनाश रेवणकर, माजी आमदार वैभव नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, बॅ. नाथ पै संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, अमरसेन सावंत, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या संध्याताई तेरसे, भाजपाचे युवा नेते भाई सावंत, राजू राऊळ आदी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या रनला सुरूवात झाली. या लक्षणीय रन मध्ये एकुण साडे बाराशेजण सहभागी झालेले असून जिल्ह्या बाहेरील तब्बल साडेसातशेजण सहभागी झाले. 

  मराठी संस्कृतीचा अविष्कार, लेझीम, ढोलपथक यामुळे या शुभारंभ सोहळ्यात एक वेगळेच वातावरण तयार झालेले होते. सर्वपक्षीय मंडळी एकत्र आल्याने काही मिश्किल संवादही ऐकायला मिळाले. माजी आमदार वैभव नाईक यांचे आगमन होताच भाई सावंत म्हणाले, चला आता तुम्ही जोरात पळा, यावर वैभव यांनी  प्रभाकर सावंत यांच्याकडे पाहून मिश्किल टोला मारला, वैभवजी म्हणाले, " आता आम्ही याना पळवत आहोत. आम्ही संध्या पळायचे थांबलोत" यावर मी म्हणालो ,"वैभवजी सध्या रिचार्ज होत आहेत"या संवादाला मा. जिल्हाधिकारी साहेबासह सर्वानीच हसून दाद दिली. 

एकंदरीत , कुडाळ  मान्सून रन २५ च्या आयोजनासाठी कार्यरत संपूर्ण टिमने अतिशय नेञदिपक आयोजन करून कुडाळच्या शिरपेचात आणखीन एक तुरा खोवला. डॉ. जी. टी. राणे कुटुंबियांचे आणि या आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या उपक्रमास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या आणि यात सहभागी होणाऱ्या सर्वाचे विशेष कौतुक होत आहे.