
कुडाळ : येथील कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने शालेय 'सेपक टकरा' स्पर्धेत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत त्यांनी अंतिम सामन्यात कलेश्वर विद्यालय नेरुर संघाचा पराभव करून सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत एकूण २१ संघांनी सहभाग घेतला होता. इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलच्या संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात वैभववाडी संघाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांनी कलेश्वर विद्यालय, नेरुर संघाचा ३ विरुद्ध १ असा पराभव केला.
या विजयी संघात कर्णधार गौरांग तिळवे, उपकर्णधार वेदांत मुळीक, तसेच आरुष धामणस्कर, वेदांत चव्हाण, आर्यन परब आणि सिद्धार्थ कदम या खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक सिद्धार्थ बावकर यांनी मार्गदर्शन केले.
आता या संघाची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, का. आ. सामंत, आनंद वैद्य, सुरेश चव्हाण, सीए सागर तेली, महेंद्र गवस आणि मुख्याध्यापिका संपदा कामत यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.