सावंतवाडी : मुंबई क्रिकेट आणि सिंधुदुर्ग यांचे नाते फार जवळचे आणि तेवढेच घट्ट आहे. 'क्रिकेटचा गॉड' सचिन तेंडुलकर हे ह्याच लाल मातीतले आणि त्यांना घडविणारे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर हे देखील सिंधूपुत्रच..! एकेकाळी भारतीय संघाची धुरा सांभाळणारे दिलीप वेंगसरकर हे देखील सिंधुदुर्ग सुपुत्रच. एवढेच काय एकेकाळी सचिनसोबत शालेय जीवनात क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणारा आणि पुढे भारतीय संघाचा एक भरवशाचा फलंदाज म्हणून नावारूपास आलेला विनोद कांबळी देखील याच लाल मातीतील अलीकडच्या काळात मुंबईकडून रणजी खेळणारा सिद्धेश लाड आणि कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळणार आयपीएल खेळणारा निखिल नाईक हे सावंतवाडीचे अर्थात सिंधूपुत्रच! ही झाली मुंबई आणि भारतीय क्रिकेटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरुषांची मक्तेदारी. आता नुकत्याच झालेल्या पहिल्या महिला 'आयपीएल'मध्ये एका सिंधू कन्येने आपल्या अष्टपैलू खेळाने मुंबई क्रिकेटमध्ये छाप सोडली आहे. हुमेरा काझी असे तिचे नाव आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचऱ्याची सुकन्या हुमेरा काझी हिने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या दर्जेदार खेळातून मुंबई इंडियन्स ला विजेते पद मिळवून देण्यासाठी मोलाचं सहकार्य करुन आचरे गावचे नाव रोशन केले आहे. तीच्या अभिनंदनाचे पोष्ट सोशल मिडीया वर व्हायरल झाले आणि आचरे काझी वाडीच्या हुमेरा काझी चे सर्वत्र कौतुक होत आहे.हुमेराला गावची ओढ पहिल्यापासूनच होती. इयत्ता तिसरीमध्ये असल्यापासूनच तिला क्रिकेट खेळाची आवड निर्माण झाली होती. गावी आल्यावर मोठ्या टीमबरोबर खेळूनही ती जिंकत होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली होती.
याबाबत तिच्याशी संपर्क साधल्यावर तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी माहिती दिली. मुंबई संघातून १६ वर्षाखालील संघातून आपल्या करिअरची सुरुवात झाल्याचे सांगत १९ वर्षाखालील संघात सुरुवातीला तिला सोळावा खेळाडू म्हणून निवड झाली होती. त्यानंतर खचून न जाताही संघात संधी मिळताच आपल्या खेळातून तिने संघात स्थान निर्माण केले.त्यानंतर २३ वर्षाखालील संघातून खेळत सिनियर संघात स्थान पटकाले. महिला भारतीय संघात दोनवेळा चॅलेंजरमधून खेळल्याचे तिने सांगितले. तिच्या खेळाने प्रभावित होत मुंबई इंडियन्सच्या संघमालक नीता अंबानी यांनी तिला मुंबई इंडियन्समध्ये संधी दिली. या संधीचा फायदा उठवित फायनल सामन्यामध्ये ऍस्मेसला रनाऊट केले होते.
आचरेगावच्या सुपूत्रीची क्रिकेटमधील एन्ट्री आचरेवासियांसाठी अभिमानास्पद ठरत असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.