किक-बॉक्सिंग स्पर्धेत रविंद्र दळवीने पटकावलं सुवर्णपदक

Edited by: विनायक गांवस
Published on: December 11, 2024 19:53 PM
views 66  views

सावंतवाडी : सातारा येथे झालेल्या विभागीय किक-बॉक्सिंग स्पर्धेत विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) संचलित राजा शिवाजी विद्यालयाच्या रविंद्र हरी दळवी या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकावून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत प्रशालेच्या गोविंद राजन दळवी व संचिता किशोर गवस यांनी रौप्य पदक तर रितेश गुणाजी सावंत व वेदांग रुपेश गवस यांनी कास्य पदक फटकावले.

         

जिल्हा स्तरावर झालेल्या किक-बॉक्सिंग स्पर्धेमधून या प्रशालेतील एकूण १० विद्यार्थ्यांची सातारा येथील विभागस्तरावर निवड झाली होती. विभागस्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये पाचही पदक प्राप्त विद्यार्थ्यांसह सुमेधा किशोर गवस, सारा महेंद्र परब, विष्णू विठ्ठल दळवी, लौकेश कृष्णा महाले, विलास सुरेश वडर या विद्यार्थ्यांनी सहभाग  घेतला होता. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रिडा शिक्षक अमित पालव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षक अमित पालव यांचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी दळवी, सचिव सुर्यकांत दळवी यांनी अभिनंदन केले. विभागीय किक-बॉक्सिंग स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी बजावल्याबद्दल या विद्यार्थ्यांची राजा शिवाजी विद्यालय ते विलवडे ग्रामपंचायतपर्यंत भव्य विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नियोजन प्रकाश दळवी व परेश धर्णे मित्रमंडळ, स्कूल कमिटी, राजा शिवाजी विद्यालय, विलवडे ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी सर्व विजयी खेळाडू व प्रशालेचे शिक्षक अमित पालव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या सर्व विजय विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी संस्थेचे माजी सेक्रेटरी राजाराम दळवी, सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, माजी उपसभापती विनायक दळवी, स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, सुरेश सावंत, विलवडे शाळा नं.१ चे मुख्याध्यापक मनोहर गवस, विलवडे शाळा नं. २ चे मुख्याध्यापक सुरेश काळे, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशालेचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहा. शिक्षक वनसिंग पाडवी यांनी तर आभार मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर यांनी मानले.