कुडाळ : माणगाव हायस्कूलच्या मैदानावर श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. संस्थेचे सचिव तथा माजी उपमुख्याध्यापक एकनाथ केसरकर यांच्या हस्ते मैदानावर श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
जीवनात तुम्ही जे विविध प्रकारचे खेळ खेळता त्यामुळे तुम्ही सुदृढ बनतात. शिस्त हे खेळातून अंगात येत असते. माणगावचा क्रीडा क्षेत्रात पहिल्यापासूनच दबदबा आहे. तोच दबदाबा आणि लौकिक टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. माणगाव म्हटल्यावर कबड्डी हे समीकरण प्रचलित होते. यानंतर शूटींग बाॅलमध्ये माणगावने आपली वेगळी ओळख निर्माण केली. टेनिस क्रिकेटमध्ये 'परफेक्ट माणगाव' असा गावाच्या संघाने जिल्ह्यात जो दबदबा निर्माण केला होता. यात प्रशांत आडेलकर, आल्हाद शिरसाट, रमाकांत ताम्हाणेकर, दीपक केसरकर, योगेश गावडे, राजू रांगणेकर, आदीनारायण वारंग, दीपक पाटणकर, विश्वास धुरी, कै.अजित वारंग, राजा नानचे, दत्तदिंगबर धुरी, संतोष नानचे, दिगंबर नानचे, सुनील वारंग, भरत केसरकर, शंशाक पाडगावकर, शैलेश विर्नोडकर, प्रवीण भिसे यांसारखे दिग्गज खेळाडूंनी क्रिकेट क्षेत्रात आपली कारकीर्द गाजवली होती. असे खेळाडू तुमच्यातून निर्माण झाले पाहिजेत, असे आवाहन संस्थेचे सचिव एकनाथ केसरकर यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर एकनाथ केसरकर, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण, शिक्षक प्रशांत आडेलकर, अमोल दळवी, साक्षी साटेलकर, गिरीश गोसावी, शंकर तामाणेकर, दिलीप गाडेकर, आर. एम. कदम, सुरेश उर्फ सचिन कुडाळकर, चंद्रकांत पटकारे, लवू सावंत आदी उपस्थित होते.