अक्सा शिरगांवकरचा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण लक्ष्यभेद

पंजाबमधील स्पर्धेत 'गोल्ड' आणि 'ब्रान्झ' अशा दोन 'मेडल्स'ना‌ गवसणी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 23, 2025 17:25 PM
views 133  views

कणकवली : आपल्या अचुक नेमबाजीने अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये 'मेडल्स'ना गवसणी घालणारी कणकवलीलील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची आठवीची विद्यार्थिनी अक्सा मुदस्सर शिरगांवकर हिने आता आणखी एका राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण लक्ष्यभेद केला आहे. सीबीएसई बोर्डातर्फे संगरूर (राज्य पंजाब) येथे पार पडलेल्या १४ वर्षांखालील नॅशनल आर्चरी चॅम्पियनशीप स्पर्धेत अक्सा हिने 'गोल्ड मेडल' प्राप्त केले. विशेष म्हणजे या स्पर्धेत अक्सा हिने 'इलिमिनेशन राऊंड'मध्ये कास्यपदकही पटकावले. अक्सा हिच्या कारकिर्दीतील राष्ट्रीय स्तरावरील हे दुसरे 'गोल्ड मेडल' आहे. राष्ट्रीय स्तरावर अक्सा हिने आतापर्यंत चार 'मेडल्स' कमवली आहेत.

१९ व २० सप्टेंबरला पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातील सर्व राज्यांतून मिळून ७२ निवडक स्पर्धक सहभागी झाले होते. 'स्कोअरिंग राऊंडम'ध्ये अतितटीच्या लढतीत अखेर अक्सा हिने यशस्वी लक्ष्यभेद करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. 'एलिमिनेशन राऊंड'मध्ये मात्र तिला कास्य पदकावर समाधान मानावे लागले.

अक्सा गेल्या तीन वर्षांपासून सातारा येथे माजी सैनिक प्रविण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दृष्टी निवासी अकादमी येथे आर्चरीचे प्रशिक्षण घेत आहेत. अक्सा हिने यापूर्वी देखील राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके प्रप्त केली आहेत. यामध्ये महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनतर्फे अमरावती येथे झालेल्या १३ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेत अक्सा हिने कारकिदींतीतील पहिले वाहिले सुवर्णपदक प्राप्त केले होते. सीबीएसई बोर्डातर्फे पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत अक्सा हिने टॉप फाईव्हमध्ये स्थान मिळवून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड पक्की केली. नंतर नवी दिल्ली येथील स्पर्धेतही तिने सुवर्णपदक प्राप्त केले होते.

अक्सा ही कणकवलीतील प्रतिथयश शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगांवकर व बचतगटाच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करणाऱ्या, अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सौ. तन्वीर शिरगांवकर यांची कन्या आहे. आपल्या यशामध्ये आई, वडिलांचा मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया अक्सा हिने दिली. तर येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.