राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत काजल कुमारी - विकास धारिया यांना विजेतेपद

Edited by: विनायक गावस
Published on: October 04, 2023 15:32 PM
views 258  views

सावंतवाडी : कै. कृष्णाकर टिपणीस यांच्या स्मरणार्थ सी. के. पी. सोशल क्लब आयोजित व सी. के. पी. ट्रस्ट पुरस्कृत ठाणे येथील सी. के. पी. हॉल येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत काजल कुमारी व विकास धारिया यांनी विजेतेपद पटकाविले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या अनुभवी काजल कुमारीने पालघरच्या उदयोन्मुख श्रुती सोनवणेला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २५-७, १९-२५ व २५-९ असे हरवून या गटाचे विजेतेपद पटकाविले. तर पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विकास धारियाने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर २५-७, २५-७ असा सपशेल एकतर्फी विजय मिळवून विजेतेपद मिळविले.

महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या मेधा मठकरीने रायगडच्या अनिता कनोजियावर २०-२२, २५-१० व २०-१५ असा विजय मिळविला. तर पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या पंकज पवारने मुंबईच्याच कुणाल राऊतवर २५-१३, २३-३ असा विजय नोंदविला. विजेत्या खेळाडूंना सी. के. पी. ज्ञातीगृह ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र टिपणीस, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, सी. के. पी. सोशल क्लबचे कार्याध्यक्ष अतुल फणसे, उदय राजे आदी मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले.