
टेनिस विश्वात सर्वात मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणऱ्या विम्बल्डन २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. या स्पर्धेतील पुरुष एकेरी प्रकारातील अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझ आणि जेनिक सिनर हे दोन्ही स्टार खेळाडू आमनेसामने आले होते. दोन्ही खेळाडूंमध्ये जेतेपदासाठी जोरदार लढत पाहायला मिळाली. दरम्यान या सामन्यात शेवटी जेनिक सिनरने बाजी मारत पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे.
हा सामना दोन्ही खेळाडूंसाठी अतिशय खास होता. कारण याआधी फ्रेंच ओपन २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यातही दोन्ही खेळाडू जेतेपदासाठी आमनेसामने आले होते. या सामन्यातही जेनिक सिनरला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण शेवटी कार्लोस अल्काराझने दमदार कमबॅक केलं आणि अविश्वसनीय विजयाची नोंद केली होती. त्यामुळे विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना हा केवळ जेतेपद जिंकण्याची संधी नसून पराभवाची व्याजासह परतफेड करण्याची संधी होती. या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करत सिनरने अंतिम सामन्यात अल्काराझवर ४-६,६-४,६-४,६-४ ने विजय मिळवत जेतेपदाचा मान मिळवला.
कार्लोस अल्काराझ हा दोन वेळचा चॅम्पियन खेळाडू आहे. त्यामुळे जेनिक सिनरकडे दोन वेळचा चॅम्पियन खेळाडूला पराभूत करून पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियन होण्याची संधी होती. सिनरने संपूर्ण सामन्यात कार्लोस अल्काराझला बॅकफूटवर ठेवलं. सिनरला पहिला सेट गमवावा लागला होता. पण त्यानंतर सिनरने दमदार कमबॅक केलं आणि मग मागे वळून पाहिलंच नाही.
दुसऱ्या सेटमध्ये सिनरने कमबॅक केलं आणि ६-४ ने विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही ६-४ ने विजय मिळवला. चौथ्या सेटमध्ये कार्लोस अल्काराझने कमबॅक केलं होतं. पण सिनरचा चॅम्पियनसारखा खेळ पाहून कार्लोस अल्काराझला माघार घ्यावीच लागली. चौथा सेटही सिनरने ६-४ ने आपल्या नावावर केला. यासह हा सामना ४-६,६-४,६-४-६-४ ने जिंकून पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.