ईशान किशानची द्विशतकी खेळी

ख्रिस गेलचा विक्रम मोडला
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 10, 2022 17:10 PM
views 255  views

चट्टोग्राम येथे खेळल्या जात असलेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अक्षरशः धावांचा पाऊस‌ पाडला. सलामीवीर ईशान किशन याने तुफानी 210 तर विराट कोहली याने 113 धावांची खेळी करत भारताला 409 धावांपर्यंत मजल मारून दिली. ‌

मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्याने भारतीय संघासाठी हा सामना प्रतिष्ठेचा बनला होता. नाणेफेक जिंकून बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शिखर धवन केवळ तीन धावा करून माघारी परतल्यानंतर ईशान किशन व विराट कोहली यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी विरोधी संघाच्या फलंदाजांना अक्षरशा गुडघे टेकण्यास भाग पाडले. ईशानने 85 चेंडूवर आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. मात्र, यानंतरही तो अजिबात थांबला नाही. त्याने आणखी आक्रमक पवित्रा घेत आपल्या शतकाला द्विशतकामध्ये परिवर्तित केले. ईशानने बाद होण्यापूर्वी 131 चेंडूचा सामना करताना 210 धावा केल्या. यामध्ये 24 चौकार व 10 षटकारांचा समावेश होता.

दुसऱ्या बाजूने विराटने संयम व आक्रमण यांचा सुरेख मेळ साधत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 72 वे शतक पूर्ण केले. त्याने बाद होण्यापूर्वी 91 चेंडूवर 11 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या.

या दोघांव्यतिरिक्त मध्यफळीतील इतर फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले. श्रेयस अय्यर 3 तर कर्णधार राहुल केवळ आठ धावा करू शकला. अक्षर पटेलने 20 व वॉशिंग्टन सुंदर याने आक्रमक 37 धावा चोपत भारतीय संघाला निर्धारित 50 षटकात 8 बाद 409 अशी मजल मारून दिली. बांगलादेशसाठी तस्किन अहमद, इबादत हुसेन व शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.