भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारला. यजमान दक्षिण आफ्रिका संघाने अवघ्या 15 षटकांमध्ये भारतीय संघाला पाच विकेट्स राखून पराभूत केले. सलामीवीर रीझा हेंड्रिक्स याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजी विभागात जेराल्ड कोएत्झी याचे प्रदर्शन विजयासाठी महत्वाचे ठरले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा दुसरा टी-20 सामना पहिल्या सामन्याप्रमाणे पावसात धुतला जाणार, अशी शक्यता होती. पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला देखील. पण सुदैवाने काही वेळातच पाऊस थांबला देखील. डकवर्थ लुईस नियमानुसार पंचांनी दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी 15 षटकांमध्ये 152 धावांचे लक्ष्य दिले. आफ्रिकी संघाने 13.5 षटकांमध्येच विजय मिळवला. भारताने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. पावसामुळे भारताचा डाव 19.3 षटकांमध्ये गुंडाळला गेला. 7 विकेट्सच्या नुकसानावर भारताने 180 धावांपर्यंत मजल मारली होती. मंगळवारी (12 डिसेंबर) झालेल्या या सामन्यात आफ्रिकी संघ जिंकल्यानंतर यजमानांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.