
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील 11वा सामना भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) पार पडला. सिडनीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 56 धावांनी सामना जिंकला. हा भारताचा या विश्वचषकातील दुसरा विजय होता. या विजयात भारतीय फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत संघाचा विजय सोपा केला. या विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार ठरला. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 179 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाला 9 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या. अशाप्रकारे भारताने हा सामना 56 धावांनी आपल्या नावावर केला. नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना टीम प्रिंगल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 20 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त कॉलिन एकरमन (17), मॅक्स ओडौड (16), बॅस डे लीड (16) आणि पॉल व्हॅन मीकरन (14) यांनीही दोन आकडी धावसंख्या करत संघाला विजयी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. या खेळाडूंव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 2 आकडी धावसंख्या पार करता आली नाही. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना 4 गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यामध्ये भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि आर अश्विन यांचा समावेश आहे. यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी याला एक विकेट घेण्यात यश आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताकडून 3 फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. यामध्ये सर्वाधिक धावा विराट कोहली (Virat Kohli) याने चोपल्या. विराटने 44 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 4 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त रोहित शर्मा (53 धावा 39 चेंडू) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 51 धावा 25 चेंडू) यांनीही अर्धशतकी खेळी साकारली. सलामीवीर केएल राहुल याला फक्त 9 धावा करता आल्या. राहुल या टी20 विश्वचषकात खराब फॉर्मचा सामना करतोय. मात्र, तरीही इतर फलंदाजांनी संघासाठी मोठी धावसंख्या उभारली आणि विजय मिळवण्यात योगदान दिले. यावेळी नेदरलँड्सकडून गोलंदाजी करताना फ्रेड क्लासेन आणि पॉल व्हॅन मीकरन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय संघाचा विश्वचषकातील पुढील सामना 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना पर्थ येथील मैदानावर रंगणार आहे.