भारताची विजयी सलामी

ऑस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात
Edited by: ब्युरो
Published on: October 08, 2023 22:18 PM
views 291  views

चेन्नई : ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताची ३ बाद २ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांची जोडी जमली आणि त्यामुळेच भारताला विजय साकारता आला. कोहली आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि त्यामुळेच भारताला वर्ल्ड कपमधील पहिल्या विदयावर शिक्कामोर्तब करता आले. कोहलीचे शतक यावेळी १५ धावांनी हुकले, तो ८५ धावांवर बाद झाला. पण राहुलने मात्र अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने हा सामना ६ विकेट्स राखून जिंकला.


भारताला इशान किशानच्या रुपात पहिल्या षटकात धक्का बसला होता. मिचेल स्टार्कने यावेळी त्याला झेल बाद केले आणि भोपळाही न फोडता इशानला बाद व्हावे लागले. त्यानंतर भारताला दुसरा धक्का बसला तो रोहित शर्माच्या रुपात. दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला जोश हेझलवूने पायचीत पकडले आणि भारताला दुसरा धक्का दिला. रोहितलाही यावेळी एक धाव करता आली नाही. दोन विकेट्स पडल्यावर खेळायला चौथ्या क्रमांकावर आला होता तो श्रेयस अय्यर. पण अय्यरलाही यावेळी भोपळा फोडता आला नाही आणि भारताला तिसरा धक्का बसला. या तीनही विकेट जेव्हा पडल्या तेव्हा भारताची एकही धाव झाली नव्हती. त्यानंतर कोहली आणि राहुल यांनी दमदार भागीदारी रचायला सुरुवात केली. कोहलीला याेळी १२ धावांवर असताना जीवदान मिळाले. या जीवदानाचा कोहलीने चंगलाच फायदा उचलला. कोहली १२ धावांवर असताना ८ व्या षटकात त्याचा झेल मिचेल मार्शने सोडला आणि तिथेच ऑस्ट्रेलियाच्या हातून मॅच निसटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कोहलीने कोणतीही जोखीम घेतली नाही. कोहली आणि राहुल या जोडीने सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. पण सेट झाल्यावर मात्र त्यांनी आपले फटके मारायला सुरुवात केली आणि ऑस्ट्रेलियावर दडपण आणले.

भारताने टॉस गमावला पण ही गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडल्याचे पाहायला मिळाले. कारण यावेळी भारताच्या गोलंदाजांनी त्यांचे काम चोख बजावले. खासकरून रवींद्र जडेजाने यावेळी तीन विकेट्स मिळवल्या आणि ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. जडेजाला अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली आणि त्यामुळेच भारताला ऑस्ट्रेलियाला १९९ धावांत ऑल आऊट करता आले.