टी20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने होते. रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी धूळ चारली. या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी अवघ्या 120 धावांचं लक्ष्य होतं. मात्र त्यांना 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 113 धावाच करता आल्या. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्ध 8 सामन्यांतील हा 7वा विजय आहे.
या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे हिरो होते जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या. या दोघांनी आपल्या गोलंदाजीनं सामना पलटवला. एके काळी पाकिस्तानची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं. जसप्रीत बुमराहनं 4 षटकात अवघ्या 14 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्यानंही फखर जमान आणि शादाब खानला बाद करून त्याला चांगली साथ दिली. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्शदीपनं सामन्यातील शेवटचं षटक टाकलं, ज्यामध्ये पाकिस्तानला विजयासाठी 18 धावा करायच्या होत्या.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियानं दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची विकेट गमावली. कोहली नसीम शाहच्या चेंडूवर 4 धावा करून पायचीत झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर आऊट झाला. रोहितनं 13 धावा केल्या. यानंतर डावखुरा फलंदाज अक्षर पटेल आणि रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 39 धावा जोडून डाव सांभाळला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षरला नसीमनं बोल्ड केलं.
अक्षर पटेल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. एकेकाळी भारताची धावसंख्या 3 गडी बाद 89 धावा होती आणि संघाला या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळेल असं वाटत होतं. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. भारतानं 30 धावांत 7 विकेट गमावल्या.
भारतीय संघ केवळ 19 षटके खेळू शकला आणि 119 धावा केल्या. रिषभ पंतनं सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. त्यानं 31 चेंडूच्या आपल्या खेळीत 6 चौकार हाणले. अक्षर पटेलनं 18 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 20 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि नसीम शाहनं प्रत्येकी 3 बळी घेतले. तर मोहम्मद आमिरला 2 विकेट मिळाल्या.