क्रिकेटच्या मैदानात भारताचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक

पाकीस्तानचा ७ गड्यांनी पराभव
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: September 14, 2025 23:30 PM
views 42  views

दुबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. क्रिकेटच्या मैदानात झालेल्या या ऑपरेशन सिंदूरच्या पुढच्या भागामध्येही भारत यशस्वी ठरला. भारताने जगासमोर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आणि मैदान कोणतेही असो, सरस कोण आहे हे सर्वांना दाखवून दिले. पहिल्या चेंडूपासून भारताने पाकिस्तानवर अंकुश ठेवला आणि त्यामुळेच भारताला पाकिस्तानला सर्वांसमोर धुळ चारता आली. भारताने अचूक गोलंदाजी करताना पाकिस्तानला १२७ या माफक धावसंख्येवर रोखले आणि त्यानंतर धडाकेबाज फलंदाजी करत त्यांचा फडशा पाडला. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर सात विकेट्स राखून दमदार विजय साकारला. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी या सामन्यात प्रत्येकी ३१ धावा केल्या.

पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने पाकिस्तानला धक्का दिला. पाकिस्तानच्या सैम आयुबला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर लगेच जसप्रीत बुमराहने आपले अस्त्र बाहेर काढले आणि पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. सूर्याने त्यानंतर भारताच्या फिरकीपटूंना मैदानात आणले. यावेळी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी पाकिस्तानच्या संघाला आपल्यापुढे लोटांगण घालण्यास भाग पाडले. कुलदीप यादवने यावेळी सर्वाधिक तीन, तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी दोन विकेट्स घेत पाकिस्तानचे जगासमोर पानीपत केले. पाकिस्तानकडून फक्त शाहिबजादा फरहानला चांगली फलंदाजी करता आली. फरहान हा बुमराहला षटकार मारणारा पहिलाच पाकिस्तानचा खेळाडू ठरला. फरहानने यावेळी एक चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४० धावा केल्या.

पाकिस्तानच्या १२८ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने भारताला धमाकेदार सुरुवात करुन दिली. शुभमन गिलही त्याच्या साथीला येत होता खरा, पण तो लवकर बाद झाला. गिलला यावेळी १० धावांवर समाधान मानावे लागले. पण अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली. अभिषेकने यावेळी १३ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३१ धावांची दमदार खेळी साकारली आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली. अभिषेक शर्मा बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी सातत्याने धावा जमवल्या आणि भारताचा विजय सुकर केला. तिलक वर्मा बाद झाल्यावर सूर्या आणि शिवम दुबे या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.