भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात पाहुण्या भारताने 200 धावांनी विजय मिळवला. शुबमन गिल आणि ईशान किशन यांच्या सलामीवीर जोडीने संघाला जबरदत्स सुरुवात दिली. सोबत संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या यांनी अर्धशतकांचे योगदान दिले. गोलंदाजी विभागातून मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी भेदक गोलंदाजी करत विरोधी संघाला गुडघ्यावर आणले. या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांची ही वनडे मालिका 1-2 अशा अंतराने नावावर केली.
भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील हा तिसरा वनडे सामना त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये पार पडला. उभय संघांतील सामन्याची नाणेफेक वेस्ट इंडीजने जिंकली आणि प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 50 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 351 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ 35.3 षटकात अवघ्या 151 धावा करून सर्वबाद झाला. भारतासाठी सलामीला आलेला शुबमन गिल सामनावीर ठरला. गिलने 92 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 85 धावांची वादळी खेळी केली होती.
भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर जोडी ईशान किशन आणि शुबमन गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी झाली. ईशान किशन यांने 64 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली, तर शुबमन गिल याने 92 चेंडूत 85 धावा कुटल्या. मागच्या सामन्यात मोठी खेली करण्यात अपयश आलेला संजू सॅमसन या सामन्यात 41 चेंडूत महत्वपूर्ण 51 धावा करू शकला. त्यानंतकर कर्णदारपदाला साजेसे प्रदर्शन हार्दिक पंड्या याच्या बॅटमधून आले. हार्दिकने 52 चेंडूत 70 धावा कुटल्या आणि संघाची धावसंख्या अजूनच उंचावली. सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत 35 धावा केल्या. वेस्ट इंडीजसाठी अल्झारी जोसेळ, गुडाकेश मोती आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. रोमारिओ शेफर्ड याला सर्वाधिक दोन विकेट्स मिळाल्या.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ फलंदाजीला आल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांचा चांगलाच धुव्वा उडवला. मुकेश कुमार याने 7 षटकात 30 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर याने 6.3 षटकांणध्ये 37 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव याने 8 षटकात 25 धावा खर्च करून दोन विकेट्स नावावर केल्या, तर यजदेव उनाडकड याला एक विकेट मिळाली. गुडाकोश मोती याने वेस्ट इंडीजसाठी सर्वोत्तम 39 धावांची खेळी केली. यजमान संघाची वरची आणि मधली फळी अपयशी ठरली असताना गुडाकेशने नाबाद 39 धावा केल्या आणि संघाची धावसंक्या कशी बशी 150 पर्यंत घेऊन गेला.