
भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 336 धावांनी पराभव केला आहे. या विजयामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. हा सामना बर्मिंघममधील एजबेस्टन मैदानावर खेळला गेला. भारतीय संघाने इंग्लंडसमोर 608 धावांचे प्रचंड मोठे आव्हान ठेवले होते. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ फक्त 271 धावाच करू शकला. या विजयात कर्णधार शुबमन गिल यांच्यासह मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी मोठा वाटा उचलला.
एजबेस्टन मैदान भारतासाठी कसोटीत नेहमीच दुर्दैवी राहिले होते. भारताने येथे पहिला कसोटी सामना 1967 मध्ये खेळला, पण तेव्हापासून 58 वर्षांत एकदाही येथे भारताला विजय मिळवता आला नव्हता. कपिल देव, एम.एस. धोनी आणि विराट कोहलीसारखे दिग्गज कर्णधारसुद्धा येथे जिंकू शकले नव्हते. अखेर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने या मैदानावर इतिहास रचला.
इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीसाठी उतरावं लागलं. भारताने पहिल्या डावात फलंदाजी करताना 587 धावांचा मोठा डोंगर उभारला, यामध्ये गिलच्या धावांचं सर्वात मोठं योगदान होतं. पहिल्या डावात राहुल लवकर बाद झाला, पण यशस्वी जयस्वालने कमालीची खेळी केली. यशस्वी जयस्वालने 107 चेंडूत 13 चौकारांसह 87 धावांची खेळी केली. तसेच करूण नायर 31 धावा करत बाद झाला होता.
शुबमन गिलने ऐतिहासिक खेळी खेळत अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. शुबमन गिलने 387 चेंडूत 30 चौकार आणि 3 षटकारांसह 269 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर रवींद्र जडेजाने 89 धावांची खेळी करत जडेजाबरोबर 200 धावांची भागीदारी रचत मोठ्या धावसंख्या रचली. शुबमन गिलने एका सामन्यात 430 धावा केल्या, तर आकाशदीपने एका सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तर मोहम्मद सिराजने 7 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडला चौथ्या डावात 608 धावांचे लक्ष्य मिळाले. पण फक्त 84 धावांतच त्यांच्या अर्ध्या फलंदाजांनी तंबू गाठला. शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी सामना ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथ यांनी बराच वेळ टिकून भारताला विजयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ते अपयशी ठरले. स्टोक्स बाद झाल्यानंतर इंग्लंडने नियमितपणे खेळाडू गमावले आणि भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.