
दुबई : आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत अमीरातीत कमालीचे औत्सुक्य आहे. तब्बल सात लाख चाहत्यांनी या तिकिटाच्या खरेदीसाठी प्रयत्न केल्यामुळे आशिया कप टी-२० ची तिकीट विक्री करणारे संकेतस्थळच कोसळले. अमीरातीत क्वचितच महत्वाच्या क्रिकेट लढती होतात. मात्र भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकीट कसे मिळणार हेच माहिती नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. हा सामना होणाऱ्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमची क्षमता २५ हजार आहे, पण सात लाख चाहते तिकीटासाठी उत्सुक आहेत. आशिया कप स्पर्धेची तिकिटविक्री १४ ऑगस्टच्या मध्यरात्री सुरू झाली. या स्पर्धेच्या ऑनलाईन तिकीटविक्रीचे हक्क प्लॅटिनमलिस्ट या अमीरातील लोकप्रिय संकेतस्थळाकडे आहेत. तिकीटविक्री सुरू झाल्यापासून तब्बल सात लाख चाहत्यांनी संकेतस्थळावरून तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिकीट खरेदी करणे अवघड झाले. भारत आणि पाकिस्तान लढत २८ ऑगस्टला संध्याकाळी ७.३० वाजता आहे.
आशिया कपच्या तिकिटविक्रीचा कार्यक्रम जाहीर होत नसल्यामुळे चाहते नाराज होते. मात्र आशियाई क्रिकेट परिषदेने १५ ऑगस्टपासून ही तिकिटविक्री सुरू होईल असे शनिवारी जाहीर केले. त्यामुळे चाहते १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच ऑनलाईन आले होते. चाहत्यांच्या जोरदार प्रतिसादामुळे संकेतस्थळ कोलमडले आणि ही तिकीटविक्री १५ ऑगस्टला दुपारपर्यंत सुरू झाली नव्हती. लवकरच तिकीटविक्री सुरू होईल, असेच संकेतस्थळावर सांगितले जात होते.