वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

Edited by: ब्युरो
Published on: September 05, 2023 17:14 PM
views 491  views

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला आजपासून बरोबर 1 महिन्यानंतर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा घाट 5 ऑक्टोबरपासून घातला जाणार आहे. स्पर्धेपूर्वी अनेक देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये आता भारतीय संघाचाही समावेश झाला आहे. भारताने मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी निवडलेल्या 17 सदस्यांपैकी 15 सदस्यांचा समावेश आहे.

वनडे विश्वचषक 2023साठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा 45 दिवस चालणार असून स्पर्धेत 10 ठिकाणी एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध 1 सामना खेळेल. गुणतालिकेतील अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

भारतीय संघ विश्वचषकातील अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी करणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. तसेच, भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध उतरेल. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान संघातील सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने 2011मध्ये अखेरचा वनडे विश्वचषक जिंकला होता. हा विश्वचषक भारताने एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली आपल्या नावावर केला होता. त्यानंतर भारताने एकही विश्वचषक जिंकला नाहीये. अशात यावर्षी भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा, अशी 140 कोटींहून अधिक भारतीयांची आशा आहे.