भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० वर्ल्डकप! ; ब्लाईंड क्रिकेट संघाने रचला इतिहास

बांगलादेशला हरवत केला विजयोत्सव साजरा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 17, 2022 16:36 PM
views 262  views

पणजी : भारतीय ब्लाईंड क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाने बांगलादेशचा पराभव केला. भारताने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचा हा केवळ तिसरा हंगाम होता. इतर कोणत्याही संघाला आतापर्यंत जेतेपद पटकावता आलेले नाही. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम खेळताना २ बाद २७७ धावा केल्या. रमेशने नाबाद १६३ धावा केल्या. अजयनेही नाबाद १०० धावा केल्या.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ३ बाद १५७ धावाच करू शकला. अशाप्रकारे भारतीय संघाने हा सामना तब्बल १२० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वाद झाला असला तरी. व्हिसा न मिळाल्यामुळे पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात येऊ शकला नाही.

यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यासामन्यात पाकिस्तानने प्रथम खेळताना ८ गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. भारताने ९ गडी राखून विजय मिळवला होता. यापूर्वी २०१२ मध्येही भारताने विजेतेपदावर कब्जा केला होता. भारताच्या ब्लाईंड संघाने एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपदही दोनदा जिंकले आहे. अशा स्थितीत त्यांचे हे एकूण पाचवे विजेतेपद आहे.