आशियाई स्पर्धा | क्रिकेटमध्ये यंग इंडियाने कमावले गोल्ड

Edited by: ब्युरो
Published on: October 07, 2023 16:47 PM
views 143  views

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील टी20 क्रिकेट खेळाचा अंतिम सामना चीनच्या हॅंगझू येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट फील्ड मैदानात खेळला गेला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानचा हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. अखेर भारतीय संघाला वरच्या क्रमवारीमुळे सुवर्णपदक बहाल करण्यात आले. 

भारतीय संघाने उपांत्य सामन्यात बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पाडाव केलेला. या अंतिम सामन्यात अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत अफगाणिस्तानला दबावात टाकले होते. अफगाणिस्तानचा अर्धा संघ केवळ 52 धावांमध्ये तंबूत परतलेला. त्यानंतर अनुभवी कमाल व नईब यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करत अफगाणिस्तानचा डाव पुढे नेला.


अफगाणिस्तान संघाने 18.2 षटकात 112 धावा केलेल्या असताना पावसाचे आगमन झाले. अखेर जवळपास एक तास पावसामुळे खेळ वाया गेल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय संघाला वरची क्रमवारी मिळाली असल्याने भारतीय संघाला विजेतेपद दिले गेले. यासह भारतीय संघाने प्रथमच क्रिकेटमध्ये सुवर्णपदक आपल्या नावे केले. यापूर्वी भारताच्या महिला संघाने देखील सुवर्णपदक जिंकले होते.