
नवी मुंबई : भारताच्या रणरागिणींनी इतिहास रचला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली प्रथम महिला वर्ल्ड कप अखेर भारताने जिंकला. शेफाली वर्मा यावेळी भारतीय संघासाठी मॅचविनर ठरली. शेफालीने फलंदाजीत सर्वाधिक ८७ धावा तर केल्याच, पण जेव्हा संघाला गरज होती तेव्हा विकेट्सही काढून दिल्या. त्यामुळे शेफाली वर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताला वर्ल्ड कपला गवसणी घालता आली. शेफालीच्या खेळीच्या जोरावर भारताने २९८ धावा उभारल्या होत्या. भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी नमवले आणि वर्ल्ड कप जिंकला.
शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. स्मृतीचे अर्धशतक यावेळी फक्त पाच धावांनी हुकले, तिने आठ चौकारांच्या जोरावर ४५ धावा केल्या. स्मृती बाद झाल्यावर शेफालीने जेमिमासह डावाला आकार दिला. शेफाली आणि जेमिमा यांनी ६२ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी उभारली. ज्यात जेमिमाने २३, तर शेफालीने ३८ धावांचे योगदान दिले. कारकिर्दीतील पहिल्या वनडे शतकाकडे वाटचाल करणाऱ्या शेफालीला खाका हिने लूस हिच्याकरवी झेलबाद केले. शेफालीने यावेळी ७८ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ८७ धावा उभारल्या. खाकाने स्थिरावलेल्या शेफालीस चूक करण्यास भाग पाडले. खाका हिने आपल्या पुढच्याच षटकात उपांत्य सामन्याच्या विजयाची शिल्पकार जेमिमा रॉड्रिग्ज (२४) हिला ‘कव्हर’ला कर्णधार वोल्वार्द हिच्याकरवी झेलबाद केले. पॉवरप्लेच्या षटकांत महागात पडलेल्या अयाबोंगा खाका हिने शेफाली आणि जेमिमा यांचा अडसर दूर करत भारताच्या धावगतीवर अंकुश लावला.
ही संथगती टाळण्यासाठी रिचा घोष हिला फलंदाजीत बढती देता आली असती, पण बहुदा पडझड रोखण्यासाठी दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांना फलंदाजीस पाठवण्यात आले. एमलाबा हिच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी कर्णधार वूलवार्द हिने दीप्तीला लाँगऑनवर ३८ धावांवर जीवदान. मग डी क्लार्क हिने आपल्याच चेंडूवर एकहाती झेल टिपत अमनजोत कौरला पॅव्हेलियनमध्ये धाडत ही जोडी फोडली. रिचाने त्यानंतर येऊन २४ चेंडूंत ३४ धावांची आक्रमक खेळी साकारली.
भारताच्या २९९ धावंचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरुवात केली होती. पण अमनज्योतच्या थेट फेकीमुळे भारताला पहिली विकेट मिळाली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या धावा रोखल्या होत्या. पण भारताच्या विजयाच्या मार्गात एकच अडसर होती आणि ती म्हणजे लॉरा वोल्ववॉर्ट. लॉराने अर्धशतक झळकावले होते आणि तिने शतकाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली होती. तिने शतक झळकावले पण संघाला ती सामना जिंकवू शकली नाही.














