भारताचा पाकिस्तानवर शानदार विजय

तिलक वर्माची खेळी निर्णायक
Edited by:
Published on: September 29, 2025 00:35 AM
views 100  views

दुबई : भारताने पाकिस्तानवर क्रिकेटच्या मैदानातही सर्जिकल स्ट्राइक करून दाखवल आणि मिशन आशिया कप यशस्वी केले. आशिया कपमध्ये एकदाही पाकिस्तानला भारताला पराभूत करता आले नाही. भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला १४६ धावांवर रोखले. पण आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे तीन फलंदाज २० धावांवर बाद झाले. पण त्यानंतर तिलक वर्माने झंझावाती फलंदाजी करत संघाला पाच विकेट्स राखून विजय मिळवून दिला आणि भारताने आशिया चषक उचलला.

पाकिस्तानने भारतापुढे १४७ धावांचे आव्हान ठेवले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले. चाहत्यांना चौकार-षटकारांच्या आतिषबाजीची आशा होती, पण तसे घडू शकले नाही. अभिषेकने चौकारासह सुरुवात केली खरी, पण त्याला यावेळी फक्त पाच धावाच करता आल्या. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यावेळी पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि तो फक्त एकच धावा करू शकला. भारताला त्यानंतर सर्वात मोठा धक्का बसला तो शुभमन गिलच्या रुपात. कारण गिल यावेळी स्थिरस्थावर होत होता, पण तोदेखील १२ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची ३ बाद २० अशी अवस्था झाली होती. त्यावेळी भारताची भिस्त ही संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या जोडीवर होती. संजू लवकर बाद झाला. पण तिलक वर्माने यावेळी धमाकेदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानच्या साहिबझादा फरहानने संघाला झोकात सुरुवात करून दिली. फरहान पहिले दोन षटकं संथपणे खेळला, पण त्यानंतर त्याने धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात केली. पाकिस्तानने यावेळी बिन बाद ८४ अशी दमदार सुरुवात केली होती. फरहानने यावेळी अर्धशतक झळकावले खरे, पण त्यानंतर तो ५७ धावांवर बाद झाला. आशिया कपच्या अंतिम सामन्यात कुलदीप यादवच्या शानदार कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानला १९.१ षटकांत १४६ धावांत गुंडाळले.

सलामीवीर साहिबजादा फरहान (३८ चेंडूत ५७) आणि फखर झमान (३५ चेंडूत ४६) यांनी दहाव्या षटकापर्यंत ८४ धावांची भागीदारी केली होती. तथापि, भारतीय फिरकीपटूंनी शेवटच्या दहा षटकांत पाहुण्यांवर प्रचंड दबाव आणला. कुलदीपने चार षटकांत ३० धावांत चार बळी घेतले, तर अक्षर पटेलने चार षटकांत २६ धावांत दोन बळी घेतले आणि वरुण चक्रवर्तीने ३० धावांत दोन बळी घेतले. एका वेळी फखर आणि सैम अयुब क्रीजवर असताना पाकिस्तानची धावसंख्या एक बाद ११३ होती. त्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्यांच्या घरासारखा कोसळला. कारण पाकिस्तानला यावेळी फक्त १४६ धावांवर समाधान मानावे लागले