
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला एजबॅस्टन मैदानावर जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी फलंदाजांसाठी अनुकूल दिसणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. कर्णधार शुबमन गिलने 269 धावांची शानदार खेळी करत नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली. त्याला यशस्वी जायसवालने 87 आणि रवींद्र जडेजाने 89 धावांनी साथ दिली. वॉशिंग्टन सुंदरनेही 42 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. एकवेळ 211 धावांवर 5 गडी गमावल्यानंतर भारताने 587 धावा उभारल्या.
इंग्लंडची डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. तिसऱ्याच षटकात आकाश दीपने दोन गडी बाद करत इंग्लंडच्या डावाला हादरा दिला. पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेल्या आकाश दीपला या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी खेळवण्यात आले. त्यांनी आपल्या दुसऱ्याच षटकात धक्कादायक कामगिरी केली.
सामन्याच्या सुरुवातीला झॅक क्रॉलीने दोन चौकार मारून दमदार सुरुवात केली होती. मात्र आकाश दीपने चौथ्या चेंडूवर डकेटला स्लिपमध्ये शुबमन गिलकरवी झेलबाद केलं. डकेट आपलं खातंही उघडू शकला नाही. त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर ओली पोपलाही आऊट केलं. पोपने लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू स्लिपमध्ये गेला. पहिल्या प्रयत्नात केएल राहुलकडून झेल सुटला, पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने झेल घेतला. विशेष म्हणजे पोपही शून्यावरच बाद झाला.
रांचीतील डेब्यू टेस्टमध्येही आकाश दीपने अशीच कामगिरी केली होती. तिथेही त्याने एका ओव्हरमध्ये डकेट आणि पोपला बाद केलं होतं. आणि विशेष म्हणजे तेव्हाही पोप शून्यावरच माघारी गेला होता. आकाश दीपची स्विंग खेळी सुरुवातीच्या टप्प्यात फलंदाजांसाठी मोठं आव्हान ठरते आहे.