वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लॉरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि मालिका वेस्ट इंडीजने नावावर केली. वेस्ट इंडीजच्या विजात सलामीवीर ब्रँडन किंग आणि गोलंदाज विभागातील रोमारियो शेफर्ड यांचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघातील फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. वेस्ट इंडीजला विजायासाठी 166 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांना 18व्या षटकात आणि अवघ्या 2 विकेट्स गमावून गाठले. मागच्या 25 महिन्यांमधील ही भारताने गमावलेली पहिली मालिका ठरली आहे. सोबतच मागच्या 17 वर्षांमधील ही भारतीय संघाची पहिली टी-20 मालिका (किमान तीन सामन्यांची) आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध भारताला अपयश आले.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकली होती. पण कर्णधाराने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय फसल्याचे दिसले. प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी एकडा सूर्यकुमार यादव अर्धशतक करू शकला. सूर्यकुमारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 45 चेंडूत 61 धावांची खेळी केली होती. निर्धारित 20 षटकांमध्ये भारतीय संघ 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरत वेस्ट इंडीजने हे लक्ष्य 8 विकेट्स राखून गाठले. सलामीवीर ब्रँडन किंग याने 55 चेंडूत 85 धावांची वादळी खेळी केली.
उभय संघांतील ही मालिका पाच सामन्यांची होती. पहिल्या दोन सामन्यात यजमान वेस्ट इंडीजने, तर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. रविवारी हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मालिकेतील तिसरा पराभव स्वीकारावा लागाल. याचसोबत मालिका वेस्ट इंडीजने 3-2 अशा अंतराने नावावर केली