टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) हा सामना खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 134 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिके पुढे ठेवले. सोप्या दिसणाऱ्या या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला धक्के बसले. मात्र, त्यानंतर मिलर व मार्करम या जोडीने शानदार खेळ दाखवत संघाला 5 गडी राखून विजय मिळवून दिला. सलग तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास पक्के केले आहे.
पहिले दोन सामने जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाने अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाला संधी दिली. दक्षिण आफ्रिकेने पहिले नऊ चेंडू निर्धाव टाकत चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर रोहित व राहुलने प्रत्येकी एक षटकार मारत धावांचे खाते खोलले. परंतु, पाचव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या लुंगी एन्गिडीने त्या दोघांना बाद करत भारताला जबर धक्के दिले. त्यानंतर सातव्या षकात विराट कोहलीला 12 धावांवर बाद करत भारतीय संघाला संकटात टाकले. भारताने 50 धावांच्या आत आपला निम्मा संघ गमावला.
त्यानंतर मागील सामन्यात अर्धशतक केलेल्या सूर्यकुमार यादवने संघाची जबाबदारी खांद्यावर घेत दिनेश कार्तिकसह 52 धावांची भागीदारी केली. कार्तिक बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने 30 चेंडूंवर आपले सलग दुसरे अर्धशतक साजरे केले. त्याने बाद होण्यापूर्वी भारतासाठी सर्वाधिक 68 धावा केल्या. अखेरच्या तीन शतकात दक्षिण आफ्रिकेने टिच्चून गोलंदाजी करत भारताला 133 धावांवर रोखले. दक्षिण आफ्रिकेसाठी एन्गिडीने सर्वाधिक चार तर, वेन पार्नेलने तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. अर्शदीपने दुसऱ्या षटकात दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. संघाच्या 24 धावा झालेल्या असताना कर्णधार बवुमानेही संघाची साथ सोडली. त्यानंतर डेव्हिड मिलर व ऐडन मार्करम यांनी सुरुवातीला सांभाळून खेळत डाव उभारणीवर भर दिला. खराब चेंडूंचा समाचार घेत त्यांनी संघाला विजयाच्या नजीक नेले. यादरम्यान दोघांना जीवदाने देखील मिळाली. चौथ्या गड्यासाठी 76 धावांची भागीदारी केल्यानंतर मार्करम वैयक्तिक 52 धावा करत बाद झाला.
मार्करम बाद झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने खेळत असलेल्या मिलरने 18 व्या षटकात अश्विनला दोन षटकार लगावत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नेला. अखेरच्या दोन षटकात 12 धावांची गरज असताना शमीने केवळ सहा धावा देत सामना रंगतदार बनवला. 20 व्या षटकात मिलरने दोन चौकार मारत सामना जिंकून दिला.