गुरुवारी 200व्या टी20 सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे भारतीय संघाचा मागील 17 वर्षांपासून सुरू असलेला अजिंक्य क्रमाला तडा गेला. खरं तर, भारतीय संघाने पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना 2006मध्ये खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले होते.
भारतीय संघाने 50व्या, 100व्या आणि 150व्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात नेहमीच विजय मिळवला होता. मात्र, वेस्ट इंडिजने 200व्या सामन्यात भारताला पराभूत करत हा अजिंक्य क्रम मोडला. विशेष म्हणजे, भारतीय संघ 200 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा दुसरा संघ बनला आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तानने सर्वाधिक 223 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
भारतीय संघाने पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006मध्ये खेळला होता. या सामन्यात भारताला 6 विकेट्सने विजय मिळवण्यात यश आले होते. यानंतर भारताने 50वा सामना खेळण्यासाठी 8 वर्षे लावली. भारताने 2014मध्ये 50व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 73 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर 4 वर्षांनी 2018मध्ये भारताने आयर्लंडविरुद्ध 100वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळताना 76 धावांनी विजय मिळवला होता. तसेच, भारताने 150वा सामना नामीबियाविरुद्ध खेळला होता, ज्यात 9 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र, 200व्या सामन्यात भारताला वेस्ट इंडिजकडून 4 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
West Indies win the first #WIvIND T20I.#TeamIndia will look to bounce back in the second T20I in Guyana. 👍 👍
— BCCI (@BCCI) August 3, 2023
Scorecard ▶️ https://t.co/AU7RtGPkYP pic.twitter.com/b36y5bevoO
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 150 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 विकेट्स गमावत फक्त 145 धावाच करता आल्या. भारताकडून एकट्या ईशान किशन याने 30 धावांचा आकडा ओलांडत 22 चेंडूत सर्वाधिक 39 धावा चोपल्या. यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचाही समावेश होता. मात्र, इतर फलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत आणि नियमित अंतराने विकेट्स गमावल्यामुळे हा सामना वेस्ट इंडिजने 4 धावांनी जिंकला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.