IND vs SA 3rd ODI: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

तीनही सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर मालिकावीर
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 11, 2022 19:05 PM
views 431  views

नवी दिल्ली : कुलदीप यादवच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजांनी कर्णधार शिखर धवनचा विश्वास सार्थ ठरवला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. भारताने आफ्रिकेला ९९ धावांवर सर्वबाद केले. याआधी १९९९ साली त्यांनी भारताविरुद्ध ११७ धावा केल्या होत्या. तर एकदिवसीय क्रिकेटमधील ही त्यांची चौथ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. चार गडी बाद करण्याऱ्या कुलदीप यादव याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तीनही सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर मालिकावीर ठरला.

या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना आज दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झाला, जिथे गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. आज मात्र पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी मैदान ओलसर असल्याने नाणेफेक उशिरा करण्यात आली. साधारण अर्धातास सामना उशिराने सुरु झाला. दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने आफ्रिकेला धूळ चारत धवनच्या नेतृत्वाखाली मालिका खिशात घातली. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार शिखर धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला व ८ धावांवर धावबाद झाला. मागील सामन्यात आक्रमक ९३ धावांची खेळी केलेल्या इशान किशनला फॉर्चुनने १० धावांवर बाद केले. त्यानंतर मागील सामन्याचा शतकवीर श्रेयस अय्यर व सलामीवीर शुबमन गिल यांची जोडी जमली. त्यानंतर त्यांनी ३९ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या दिशेने नेले. गिलने ४९ तर अय्यरने २८ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना अतिशय खराब सुरुवात केली. बहुतेक त्यांच्यापैकी कर्णधार टेम्बा बावुमा आणि मागच्या सामन्यातील कर्णधार केशव महाराज हे दोघेही शेवटच्या सामन्यात खेळले नाहीत. ते का खेळले नाहीत याचे अद्याप स्पष्ट कारण समोर आले नाही. नाणेफेक करण्यासाठी डेव्हिड मिलर आला होता. सलामीवीर सलामीवीर क्विंटन डिकॉक आज फार काही करू शकला नाही वॉशिंग्टन सुंदरने त्याला ६ धावांवर माघारी धाडले. डिकॉक बाद झाल्यानंतर जानेमाम मलान चांगला खेळताना दिसत होता. मात्र मोहम्मद सिराजने त्याला शॉर्ट बॉलवर आवेश खान करवी १५ धावांवर झेलबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.

आजच्या सामन्यात खरी कमाल केली ती गोलंदाजांनी.भारताचे दोन्ही फिरकीपटू कुलदीप यादव आणि नवखा शाहबाज अहमद यादोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ बाद केला. या दोन्ही फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अक्षरशः नाकीनऊ आणले. ही त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. कर्णधार डेव्हिड मिलर, ऐडन मार्करम या सामन्यात अपयशी ठरले. पहिल्या दहा षटकातच संघाने ३ गडी गमावले होते. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराज रीझा हेंड्रिक्सला बाद केले. २१ चेंडूत केवळ ३ धावा करत सिराजने रिझाला रवी बिश्नोईकरवी झेलबाद केले. आधीच्या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी केलेल्या हेन्रिक क्लासेनने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. त्याने संघासाठी सर्वाधिक ३४ धावांचे योगदान दिले. या दौऱ्यावर प्रथमच खेळण्याची संधी मिळालेल्या अष्टपैलू मार्को जेन्सनने १४ धावा केल्या. भारतासाठी सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. वॉशिंग्टन सुंदर व सिराज यांनी सुरुवातीचे चार गडी बाद केले आफ्रिकेला बॅकफूट ढकलले.