नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतीय संघाचा तिसरा एकदिवसीय सामना काल ( 21 डिसेंबर) गुरुवारी खेळवण्यात आला. या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघाला द. आफ्रिकेच्या संघावर 78 धावांनी विजय मिळवता आला आहे. त्यामुळे के. एल. राहुलच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या या मालिकेमध्ये भारतीय संघाने आफ्रिकेला त्यांच्या मायदेशात पराभूत केले आहे.
भारतीय संघाचा खेळाडू संजू सॅमसन हा या सामन्याचा हिरो ठरला असून त्याने कालच्या सामन्यामध्ये धमाकेदार शतक झळकावले तर भारतीय गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला काही तासांमध्येच पुन्हा तंबूत पाठवण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले. ज्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये इतिहास रचता आलेला आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीतच हा द्विपक्षीय वनडे सिरीज मधील दुसरा विजय मिळवलेला आहे. याआधी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आठ द्विपक्षीय वनडे सिरीज खेळल्या होत्या. त्यापैकी केवळ एकच मालिका भारतीय संघाला जिंकता आली होती. 2018 मध्ये भारतीय संघाने एकमेव मालिका जिंकलेली होती. त्यानंतर आता नऊ पैकी दुसरी मालिका जिंकण्यामध्ये भारतीय संघाला यश मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट गमावून 296 धावा केल्या होत्या. ज्यामुळे आफ्रिकेच्या संघाला 297 धावांचे लक्ष पार करायचे होते. मात्र, आफ्रिकेचा संघ 45.5 षटकांत 218 च धावा करू शकला.
भारत वि. द. आफ्रिका संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला सुरुवातीला चांगली कामगिरी करता आली नाही. सुरुवातीलाच भारताने 49 धावांमध्ये 2 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर मात्र, संजू सॅमसन आणि कर्णधार के. एल. राहुल यांनी 21 चेंडूमध्ये 52 धावांची भागीदारी करून डाव थोडा सांभाळला. मात्र, राहुल बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने टिळक वर्मासोबत 116 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला धावांचा डोंगर रचून दिला. पण, टिलक वर्मा देखील 52 धावा करून बाद झाला. परंतु, संजूने धमाकेदार खेळी करत 110 चेंडूत कारकिर्दीतले पहिले एकदिवसीय शतक झळकावले. यानंतर संजूही 114 चेंडूत 108 धावा करून बाद झाला. त्याने 3 षटकार आणि 6 चौकार मारले. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्सने 3 तर नांद्रे बर्गरने 2 विकेट्स घेतले. तर लिझाड विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.