अहमदाबाद : भारत-पाकिस्तान सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मोठमोठ्या दिग्गजांपासून ते क्रिकेटप्रेमींपर्यंत सर्वच जण या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा बहुप्रतीक्षित असा सामना पाहण्यासाठी गोळा होणार आहेत. दोन्ही संघ आत्मविश्वासाने भरलेले आहेत. या हायव्होल्टेज सामन्यासाठी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमही सज्ज झाले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ एकदिवसीय विश्वचषकात इंडियाची अजिंक्य विजयगाथा रोखू पाहणार आहे, तर भारताला हे यश मिळवून १४० कोटींहून अधिक चाहत्यांना ८-० अशा विजयी अंकांची भेट द्यायची आहे.
आपल्या सोशल मीडियावर माहिती देताना बीसीसीआयने सांगितले की, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी विशेष कार्यक्रम होणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी होणारा हा कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी १.३० वाजता होईल. हा सामना पाहण्यासाठी देशातील अनेक बडे कलाकार आणि राजकारणीही उपस्थित राहणार आहेत. अरिजित सिंहसोबत शंकर महादेवन, सुनिधी चौहान, नेहा कक्कर आणि पंजाबी गायक सुखविंदर सिंग या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत.