
अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी-20 सामना भारतीने रविवारी (14 जानेवारी) 6 विकेट्स राखून जिंकला. या विजयासोबतच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आगाडी देखील घेतली. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर रविवारी शिवम दुबे पुन्हा एकदा मॅच विनर ठरला. 173 धावांचे लक्ष्य गाठताना दुबेने अवघ्या 32 चेंडूत 63* धावांची खेळी केली. त्याचसोबत सलामीवीर यशस्वी जयस्वाल यानेही सर्वाधिक 68 धावा कुटल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतासाठी सलामीवीर जयस्वाल या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. जयस्वालच्या साधीने मैदानात आलेला रोहित शर्मा मात्र सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली 16 चेंडूत 29 धावा करून नवीन उल हक याची शिकार बनला. त्याने इब्राहिम झद्रानच्या हातात झेल दिला आणि विकेट गमावली. चौथ्या क्रमांकावर आलेला शिवम दुबे मात्र याही सामन्यात धमाका करण्याच्या मनस्थितीत होता. मालिकेतील पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात शिवमने अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने त्याने 63* धावा कुटल्या. यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा यानेही शुन्यावर विकेट गमावली. फिनिशर रिंकू शर्मा याने 9 चेंडूत 9* धावा केल्या.
तत्पूर्वी भारतासाठी गोलंदाजी विभागातून अर्शदीप सिंग याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर शिबम बुदे याला एक विकेट मिळाली. अक्षरने घेतलेल्या दोन विकेट्ससाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला.
अफगाणिस्तानसाठी फजलहक फारुकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. करीम जनातने 2 षटकात 13 धावा खर्च करून सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले होते. एकटा गुलबदीन नायब सोडला तर अफगाणिस्तानसाठी एकही खेळाडू मोठी खेली केरू शकला नाही. गुलबदीन याने 35 चेंडूत 57 धावा केल्या. संघातील इतर एकही खेळाडू 23 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही.