हिटमॅन रोहित शर्माचा राजकोटमध्ये षटकारांसोबत विक्रमांचा पाऊस

युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलसह गुप्टिल, सेहवागला टाकले मागे :
Edited by: ब्युरो
Published on: September 28, 2023 14:49 PM
views 557  views

राजकोट : 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेगळ्याच मूडमध्ये दिसून आला. राजकोटच्या मैदानावर ३५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित आपल्या पूर्वीच्या भूमिकेत शिरल्याचे दिसून आले. त्याने अवघ्या ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, रोहितचे शतक हुकले. त्याने ५७ चेंडूंचा सामना करत ८१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ६ षटकार मारले. रोहितने ६ षटकार खेचून नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५५० षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने ४७१ डावात हा आकडा गाठला. तर गिलने ५४४ डावात हा विक्रम केला होता. मात्र, सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा विक्रम गेलच्याच (५५३) नावावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला फक्त तीन षटकारांची गरज आहे.

एका देशात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम

एका देशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा पराक्रम रोहितने केला आहे. त्याने या बाबतीत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकले आहे. रोहितने भारतात २५७ षटकार ठोकले. न्यूझीलंडमध्ये गुप्टिलने २५६ षटकार मारले होते. त्याच्यानंतर ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंडमध्ये २३०), ख्रिस गेल (वेस्ट इंडिजमध्ये २२८) आणि एमएस धोनी (भारतात १८६) यांचा क्रमांक लागतो. याशिवाय ३५०, ४००, ४५०, ५०० आणि ५५० षटकार ठोकणारा रोहित शर्मा भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

एका डावात ५ किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याचा विक्रम

एका डावात सर्वाधिक ५ किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा रोहित हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याने असे ३१ वेळा केले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत केवळ १० वेळा हा पराक्रम केला आहे. युवराज सिंग (९ वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे. धोनी, सचिन तेंडुलकर, कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी ८ वेळा ५ किंवा त्याहून अधिक षटकार ठोकले आहेत.

पहिल्या १० षटकांत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम

२००२ पासून, वनडेमध्ये पहिल्या १० षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहितच अव्वल आहे. त्याने आतापर्यंत ८९ षटकार मारले आहेत. रोहितनंतर या यादीत सेहवाग (४३), शिखर धवन (२४), सचिन (१२), शुभमन गिल (१२), कोहली (११) आणि सौरव गांगुली (११) यांचा नंबर लागतो.