
सिंधुदुर्गनगरी : मध्यप्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या उमंग राष्ट्रीय दिव्यांग महिला क्रिकेट कप २०२५ स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाने दणदणीत विजय मिळवत राष्ट्रीय ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संघाचे नेतृत्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील स्मिता सुनिल गावडे यांनी केले.
मध्यप्रदेशातील भोपाळ येथील ओल्ड चॅम्पियन मैदानावर उमंग गौरवदीप वेलफेअर सोसायटीच्या वतीने या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंड या चार राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने झारखंड संघावर मात करत शानदार विजय मिळवला.
महाराष्ट्र संघाच्या यशात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन दिव्यांग महिला खेळाडूंचा मोलाचा वाटा राहिला. कर्णधार स्मिता सुनिल गावडे (वेंगुर्ला), शिल्पा गाविंद गावकर (मालवण–आचरा) आणि दिक्षा दिनेश तेली (देवगड) या तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘दिव्यांगत्व ही अडथळा नाही’ हे सिद्ध करून दाखवले. राज्यासाठी खेळत त्यांनी चॅम्पियन ट्रॉफी महाराष्ट्रात आणली, याचा जिल्ह्यासह राज्याला अभिमान आहे.














