सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडी येथील मदर क्वीन्स हायस्कूलचा विद्यार्थी कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर यांन प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकाविले. आता तो मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत आयुषने 400 पैकी 378 गुण मिळविले होते. यापूर्वी असोसिएशनच्या दिल्ली आणि भोपाळ येथे झालेल्या स्पर्धेत तो राष्ट्रीय खेळाडू म्हणून घोषित झाला आहे. त्याला सावंतवाडी येथील उपरकर शूटिंगचे कांचन उपरकर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू विक्रम भागले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या यशाबद्दल मदर्स क्वीन हायस्कूलचे अध्यक्ष खेम सावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखमराजे भोसले, श्रद्धाराजे भोसले आणि प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे. आयुषच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.