बांदा केंद्राला सर्वसाधारण विजेतेपद!

बांदा प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सव संपन्न
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 22, 2022 16:25 PM
views 210  views

 बांदा : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा, कला, अभिनय व बौध्दिक क्षमतेला संधी देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा, यासाठी दरवर्षी केंद्र स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ झाला असून बांदा प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला.

 बांदा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या क्रीडा महोत्सव बांदा प्रभागातील बांदा, इन्सुली, शेर्ल, तांबुळी, नेतर्डे या केंद्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, प्रभागातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, केंद्रप्रमुख संदीप गवस, अनंत कदम, लक्ष्मीकांत ठाकूर, श्रद्धा महाले आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रभागातील सेवाज्येष्ठ शिक्षक श्रीकांत आजगावकर, सरोज नाईक, सुप्रिया सावंत, विजय देसाई व सेवानिवृत्त झालेले प्रदीप सावंत आदि शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात पहिल्या दिवशी बांदा केंद्र शाळेत समुहगीत, समुहनृत्य व 'ज्ञानी मी होणार!' या स्पर्धा संपन्न झाल्या तर दुसऱ्या दिवशी खेमराज हायस्कूलच्या क्रिडांगणावर सांघिक व मैदानी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.  या स्पर्धेत बांदा केंद्राने ९५ गुण मिळवत प्रभागात सर्वसाधारण विजेतेपद मिळाले तर तांबुळी केंद्राला ६५ गुणासह उपविजेतेपद मिळाले. या दोन्ही केंद्रांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतून यशस्वी निवड  झालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांनी केले. सूत्रसंचालन जे. डी. पाटील तर आभार केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी मानले.