
ब्युरो न्यूज : हैदराबादच्या गल्लीतून सुरू झालेला प्रवास, कठीण प्रसंगांवर मात करत भारतीय संघात आपलं ठसा उमटवणारा एक तेजस्वी वेगवान गोलंदाज म्हणजे मोहम्मद सिराज. नुकत्याच झालेल्या ओव्हल कसोटीत इंग्लंडविरुद्ध भारताचा विजय ठरवणारा हिरो म्हणून तो पुन्हा एकदा प्रकाशझोतीत आला आहे. सिराजने या पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ असे एकून ९ बळी घेत विजयाच्या माळेत महत्त्वाचा दागिना जोडला. या मालिकेत त्याने तब्बल १८५.३ षटके टाकत २३ बळी घेतले आणि भारतीय संघाचा नवा ‘स्पीड स्टार’ म्हणून ओळख मिळवली.
पण या वेगवान गोलंदाजाची या यशामागची गोष्ट जितकी प्रेरणादायी आहे, तितकीच हृदयस्पर्शीही आहे. सिराजच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी हैदराबादच्या रस्त्यांवर ऑटो चालवत घराचा गाडा ओढला. 'जा, तुझ्या बापासारखा ऑटो चालव,' अशा टोमण्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण त्याने त्याच शब्दांतून उभारी घेतली. यावेळी तो नेहमी म्हणायचा किंबहुना अजूनही हेच म्हणतो , "माझ्या वडिलांचं काम माझ्यासाठी अभिमानाचं आहे, अपमानाचं नव्हे !"
सिराजचा क्रिकेटमधील प्रवास खडतर होता. सरावानंतर पायी चालत घरी जाणं, उपाशी राहणं, सामन्यांमध्ये संधी मिळेपर्यंत वाट पाहणं या सारख्या अनेक अडचणींना तो समोर गेला. 'भूक काय असते, हे मला प्रॅक्टिस नंतर घरी पायी चालत जाताना वाटेवर कळलं. पण त्या भुकेनं माझं स्वप्न कधीच विझू दिलं नाही,' असं तो म्हणाला .
एक भावनिक पोस्ट करत त्याने आपल्या जुन्या कौटुंबिक फोटोसोबत लिहिलं होतं कि 'माझी टेस्ट कॅप हे फक्त यशाचं नव्हे, तर माझ्या वडिलांच्या मेहनतीचं प्रतीक आहे. तुम्ही कोणत्याही पार्श्वभूमीतले असलात, मेहनत केली तर यश नक्की मिळतं.' त्याच्या या पोस्टनंतर सोशल मिडियावर त्याच्या यशापुर्वीच्या जीवनविषयक जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली.
ओव्हल कसोटीत त्याने घेतलेल्या शेवटच्या तीन बळींनी इंग्लंडचा डाव कोसळला आणि भारताने मालिका बरोबरीत आणली. आता सोशल मीडियावर त्याचं प्रचंड कौतुक होतंय. त्याच्या साधेपणाची, चिकाटीची, आणि कष्टातून घडलेल्या स्वप्नांची सगळीच लोक भरभरून तारीफ करतात आहेत.
आज मोहम्मद सिराज प्रत्येक तरुणासाठी एक उदाहरण ठरला आहे. त्याच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी प्रत्येकाला सांगते की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी स्वप्नं पाहायची आणि ती साकार करायची हिंमत कधीच सोडायची नसते.' स्पीड स्टार' म्हणून हैदराबादच्या गल्लीतून सबंध जगासमोर नावरुपास आलेला भारताच्या या पुत्राने देशाचे नाव उंचावले आहे.