भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं निधन !

Edited by: ब्युरो
Published on: October 23, 2023 16:36 PM
views 225  views

नवी दिल्ली : भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. १९६७ ते १९७९ या कालावधी त्यांनी भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आणि २६६ विकेट्स घेतल्या. १० वन डे सामन्यांत त्यांच्या नावावर ७ विकेट्स आहेत. बेदी एक उत्तम डावखुरे फिरकीपटू तसेच उत्तम कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत ४०० धावांचे आव्हान पार केले होते आणि १९७७-७८ मध्ये बेदींच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने जिंकले, मात्र ऑस्ट्रेलियाने ती मालिका ३-२ ने जिंकली.

बेदी, इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस वेंकटराघवन हे भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या आक्रमणाचे जनक होते. बेदी यांनी भारताला पहिली वन डे मॅच जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी १९७५च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ईस्ट आफ्रिकेविरुद्ध १२-८-६-१ अशी स्पेल टाकली आणि आफ्रिकेला १२० धावांवर रोखले.  

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी प्रथम उत्तर पंजाबसाठी खेळले, जेव्हा ते फक्त पंधरा वर्षांचे होते आणि १९६८-६९ मध्ये ते दिल्लीला गेले आणि १९७४-७५च्या रणजी करंडक स्पर्धा त्यांनी गाजवलीव ६४ बळी घेतले. बेदी यांनी अनेक वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६० विकेट्ससह आपली कारकीर्द पूर्ण केली.