
सावंतवाडी : शहरातील मिलाग्रीस येथील इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी फुटबॉल खेळाडू समृद्धी अरुण गावडे हिच्या फुटबॉल खेळातील प्राविण्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने गौरव करण्यात आला.
समृद्धी गावडे हिने नुकताच आपल्या उत्कृष्ट जोरावर महाराष्ट्र राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी व भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समृद्धी हिचा मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर शासनाची स्कॉलरशिप देऊन सत्कारही झाला. हे प्राविण्य प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक समृद्धीने वाढवला. त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने तिचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सेक्रेटरी सिताराम तेली, खजिनदार आनंद रासम यांसह रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे तमाम पदाधिकारी तसेच समृद्धी हिचे वडील सेवानिवृत्त सैनिक अरुण गावडे उपस्थित होते.













