सावंतवाडी : भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा १५ व १६ ऑगस्ट रोजी सावंतवाडी जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस ही स्पर्धा खेळवली जाणार असून या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. तब्बल ३० हून अधिक संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेदरम्यान जिल्ह्यातील फुटबॉलप्रेमी ज्येष्ठ खेळाडू, पंच व खेळाडू घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संदीप गावडे मित्रमंडळाचे अनिकेत आसोलकर यांनी दिली आहे. ही स्पर्धा १५ व १६ ऑगस्टला सावंतवाडी नगरपालिकेच्या जिमखाना मैदानावर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५० हजार तर द्वितीय पारितोषिक २५ हजार देण्यात येणार आहे. त्याच बरोबर वैयक्तिक ५ हजार रुपयाची पारितोषिक देण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत या स्पर्धेसाठी
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुरसह गोवा राज्यातील अनेक संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा २ दिवस खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात फुटबॉल खेळात आपला सहभाग दर्शविणाऱ्या आणि नवोदित खेळाडू घडविण्यासाठी परिश्रम घेणारे क्रीडा शिक्षक, पंच आणि जुन्याजाणत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक, पंच व खेळाडूंनी आपली अधिक माहिती चैतन्य सावंत ९०११२३४७७२ यांच्याकडे द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.