कतार येथे सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली. विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेटिनाच्या संघाला आशियाई संघ सौदी अरेबियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. मध्यंतराच्या एका गोलच्या पिछाडीनंतरही उत्तरार्धात सालेह अलशेरी आणि सालेम अलडावसारी यांनी पाच मिनिटांच्या अंतराने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर सौदी अरेबियाने त्यांच्या फुटबॉल इतिहासातील सर्वांत मोठा विजय साकारला. हा विजय सौदी अरेबियासाठी किती महत्त्वाचा आहे हे यावरुनच दिसून येत आहे की या एका विजयासाठी सौदी अरेबियाच्या राजाने आज संपूर्ण देशभरामध्ये सुट्टी जाहीर केली आहे.
सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सौदी अरेबियाला यापूर्वीच्या पाच स्पर्धांमध्ये एकही सामना जिंकता आला नव्हता. हा अपयशाचा डाग सौदी अरेबियाने थेट अर्जेंटिनासारख्या दादा संघाला पराभूत करुन खोडून काढला. या अनपेक्षित विजयानंतर सौदी अरेबियाच्या चाहत्यांनी मैदानाबाहेर मोठं सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या विजयानंतर सौदी अरेबिया सरकारने लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (२३ नोव्हेंबर) राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. तसेच देशातील सर्व शैक्षणिक संस्थांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज सौदी अरेबियातील शेअर बाजारही बंद राहणार आहे. सौदी अरेबियामधील सरकारी वृत्तवाहिनीच्या हवाल्याने ‘खलिज टाइम्स’ने हे वृत्त दिलं आहे.
अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीने चार विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करण्याची किमया या वेळी साधली खरी, पण तो संघाला विजयी करू शकला नाही. सामन्याच्या दहाव्याच मिनिटाला मेसीने पेनल्टीच्या साहाय्याने गोल करून अर्जेटिनाला आघाडीवर नेले होते. मध्यंतरापर्यंत अर्जेटिनाला आघाडी राखण्यात यश आले. मात्र, उत्तरार्धात पाच मिनिटांच्या अंतराने सौदी अरेबियाने दोन गोल करून सनसनाटी निर्माण केली. सामन्याच्या ४८व्या मिनिटाला अगदी मैदानालगत किक मारून शेरीने गोलजाळीचा अचूक वेध घेतला. बरोबरीनंतर प्रेरित झालेल्या सौदी अरेबियाच्या आक्रमणांना वेगळीच धार आली आणि ५३व्या मिनिटाला गोलकक्षाच्या रेषेवरून डावसारीने गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. या गोलनंतर स्टेडियमवर काही काळ शांतता पसरली. अर्जेटिनाला यानंतर पुनरागमन करता आले नाही. सौदी अरेबियाने अशा प्रकारे पहिल्यांदाच एखादा सामना जिंकल्यानंतर सुट्टी जाहीर केलेली नाही. यापूर्वीही कॅमेरॉननेही अशाप्रकारे विश्वचषक स्पर्धेमधील विजयानंतर सुट्टी जाहीर केली होती. कॅमेरॉननेही अर्जेंटिनाला १९९० साली पराभूत केलं होतं.