इंग्लंडचा टी20 मालिका विजय

ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिका खिशात
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 12, 2022 19:12 PM
views 172  views

अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या टी20 विश्वचषकापूर्वी गतविजेते ऑस्ट्रेलिया व यावेळी विजेचेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंड यांच्यामध्ये तीन टी20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. कॅनबरा येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विश्वचषकापूर्वी झालेला हा पराभव ऑस्ट्रेलियासाठी डोळे उघडायला लावणारा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय.

मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आपला सर्वात मजबूत संघ खेळवला. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फलंदाजासाठी आमंत्रित केले. मागील सामन्यात शतकी सलामी दिलेले जोस बटलर व ऍलेक्स हेल्स या सामन्यात प्रभावी ठरले नाहीत. स्टोक्स व ब्रुक आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. मात्र, डेव्हिड मलानने गावाची सूत्रे हाती घेत शानदार अशी 82 धावांची खेळी केली. त्याला उपकर्णधार मोईन अली याने आक्रमक 44 धावा काढत साथ दिली. इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 7 बाद 178 अशी आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावर लावली.

विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियासाठी सुरुवात तितकी चांगली राहिली नाही. वॉर्नर-फिंच या सलामीवीरांसह ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात तंबूत परतला. त्यानंतर मिचेल मार्श व मार्कस स्टॉयनिस या अष्टपैलू जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. मार्श 45 व स्टॉयनिस 22 धावा काढून परतले. टीम डेविड याने आक्रमण करत 23 चेंडूवर 40 धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेड व पॅट कमिन्स हे अखेरच्या षटकात 22 धावा करू शकले नाहीत. परिणामी त्यांना आठ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडसाठी सॅम करनने सर्वाधिक तीन बळी मिळवले. शानदार अर्धशतक करणार इंग्लंडचा डेविड मलान सामनावीर ठरला. मालिकेतील अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आता ऑस्ट्रेलियासमोर असणार आहे.