सावंतवाडी : रत्नागिरी येथे पहिल्या दिवशी झालेल्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत 100 मिटर धावणे स्पर्धेत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पदकांचे खाते उघडले आहे.
कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा रत्नागिरी येथे सुरू आहेत. पहिल्या दिवशी 100 मिटर धावणे स्पर्धेत शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणजे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. शेती कामात केलेली व्यायामरूपी मेहनत आज त्यांच्या उपयोगी पडली अशा प्रतिक्रिया सावंतवाडी तालुक्यातून जाणकारांनी दिल्या आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, आमदार भास्कर जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचा सन्मान करण्यात आला.