सावंतवाडीत जिल्हास्तरीय 'मॅरेथॉन स्पर्धा'

सेवा पंधरवड्यानिमित्ताने भाजपचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: September 24, 2025 13:52 PM
views 100  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिनी जिल्हास्तरीय 'नमो युवा रथ'चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आले असून आरोग्य, नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. ड्रग्सबाबत जनजागृती यातून केली जाणार आहे. रविवार २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, युवराज लखमराजे भोंसले व भाजप युवा नेते संदीप गावडे यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

दरम्यान, सेवा पंधरवड्या निमित्ताने भाजप सेवेचे विविध उपक्रम राबविते. समाजोपयोगी सेवा उपक्रम आम्ही राबवितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिन ते महात्मा गांधी जयंती असा हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही सावंतवाडीत जिल्हास्तरीय 'मॅरेथॉन स्पर्धा' घेत आहोत. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. रविवारी २८ सप्टेंबर रोजी शिव उद्यान येथून यास प्रारंभ होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे‌. 

फिट इंडिया, देशप्रेम जागवणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन युवा नेते संदीप गावडे यांनी केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, माजी सभापती रविंद्र मडगावकर, दिलीप भालेकर, ॲड. संजू शिरोडकर, सागर ढोकरे, पराशर सावंत, ॲड. चैतन्य सावंत, राज वरेकर आदी उपस्थित होते.