धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा

ICC कडून हॉल ऑफ फेममध्ये समावेश
Edited by: ब्‍युरो
Published on: June 11, 2025 12:56 PM
views 60  views

नवी दिल्‍ली : ‘कॅप्टन कूल’ अशी ओळख असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकताच त्याचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. हा सन्मान मिळवणारा धोनी हा भारताचा ११ वा खेळाडू ठरला आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००९ मध्ये प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रमुख आयसीसी स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. अशी कामागिरी करणारा तो एकमेव कर्णधार आहे. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वात भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले.

याशिवाय २०११ मध्ये, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक जिंकत भारताने २८ वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेतेपद पटकावले. २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत धोनीने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. धोनीच्या या यशस्वी कारकीर्दीसाठी आयसीसीने त्याला सन्मानित केलं आहे. धोनीचा हॉल ऑफ फेममधील समावेशाची घोषणा करताना आयसीसीने म्हटले, “धोनीचे नेतृत्व, त्याची दबावाखाली शांत राहण्याची क्षमता आणि मैदानावरील चतुराई यामुळे तो क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.” धोनीने ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्याने यष्टिरक्षक म्हणूनही अनेक विक्रम नोंदवले आहेत.