
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगावची आर्या जाधव हिची महाराष्ट्र संघाच्या ( अंडर - 19 T20) महाराष्ट्र संघासाठी होणाऱ्या निवड स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिरगाव हायस्कूल आणि शिरगाव क्रिकेट अकॅडमी साठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. शिरगाव हायस्कूल शिरगाव आणि शिरगाव क्रिकेट अकॅडमीची कन्या असलेली इयत्ता १० वी मध्ये शिकणारी आर्या अभिजित जाधव हीची अंडर-19 T20 महाराष्ट्र संघासाठी होणाऱ्या निवड स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आज आर्या धुळे, शिरपूर येथे ही स्पर्धा खेळण्यासाठी रवाना झाली आहे.या निवड स्पर्धेत तिचा उत्कृष्ट खेळ झाल्यास ती थेट महाराष्ट्र संघात स्थान मिळवणार आहे.शाळा, गाव आणि अकॅडमीसाठी हा मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे.
एका लहान गावातील साध्या शाळेत शिकणारी आर्या, आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आता महाराष्ट्र संघाच्या दारात उभी आहे. तिच्या मेहनतीला आणि तिच्या स्वप्नांना आज संपूर्ण शिरगावातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिरगाव क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक सुधीर साटम यांनी तिच्या यशाला आकार दिला आहे. आर्या केवळ शाळेचा नव्हे तर संपूर्ण शिरगावचा अभिमान बनली आहे. तिच्या या पुढील वाटचालीसाठी तिला सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.