वर्ल्डकपमधून बाहेर पडूनही संघ मालामाल

लाखांची केली कमाई
Edited by: ब्युरो
Published on: November 14, 2023 12:58 PM
views 194  views

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. त्यात यजमान भारतासह दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांचा समावेश आहे. तसेच, स्पर्धेत भाग घेणाऱ्या 6 संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. स्पर्धेचा अखेरचा साखळी सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात खेळला गेला. अशात उपांत्य आणि अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या संघांवर पैशांची बरसात होणार आहेच, पण त्यासोबतच उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय न करणारे संघही मालमाल झाले आहेत. आयसीसीने विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडलेल्या 6 संघांसाठीही लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.

विश्वचषकासाठी आयसीसीचे बक्षीस - आयसीसीने विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी एकूण 10 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार, 82.93 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. उपांत्य फेरीत न पोहोचणाऱ्या प्रत्येक संघाला एक लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 82 लाख रुपये मिळतील. त्यात इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांचाही समावेश आहे. तसेच, साखळी फेरीतील प्रत्येक सामना जिंकल्यावर संघांना 40 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास 33.17 लाख रुपये मिळतील.

उपांत्य फेरीसाठी किती बक्षीस? - विश्वचषकातील उपांत्य आणि अंतिम सामन्यातील बक्षीस रक्कमाचा विचार केला, तर विजेत्या संघाला 40 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 33.17 कोटी रुपये मिळतील. तसेच, उपविजेत्या संघाला 20 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 16.58 कोटी रुपये मिळतील. उपांत्य सामन्यात पराभूत झालेल्या दोन संघांना प्रत्येकी 8 लाख डॉलर्स म्हणजेच 6.63 कोटी रुपये मिळतील.

भारतीय संघाची आतापर्यंतची कमाई - भारतीय संघाने साखळी फेरीतील आतापर्यंत 8 सामने जिंकले आहेत. तसेच, संघाने आतापर्यंत जवळपास 2.98 कोटी रुपये कमावले आहेत. दुसरीकडे, उपांत्य फेरीत पोहोचून भारताने 6.63 कोटी रुपयांची रक्कम पक्की केली आहे. भारताने न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर भारत कमीत कमी 16.58 कोटी रुपयांचे बक्षीस पक्के होईल.