अॅडलेड : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात बुधवारी भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाने संथ सुरुवातीनंतर केएल राहुल, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्या शानदार खेळाच्या जोरावर बांगलादेश समोर विजयासाठी १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. बांगलादेशच्या डावाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावल्यानंतर बदललेल्या समीकरणानंतरही गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारतीय संघाला ५ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपली जागा जवळपास पक्की केली आहे.
उपांत्य दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ २ धावा करू शकला. या विश्वचषकात आतापर्यंत अपयशी ठरलेल्या के. एल. राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३२ चेंडूवर ५० धावा केल्या. सूर्यकुमारने केवळ १६ चेंडूंवर ३० धावांचा तडाखा दिला. अनुभवी विराट कोहलीने अखेरपर्यंत नाबाद राहत ४४ चेंडूत ६० धावा करत संघाला १८४ पर्यंत मजल मारून दिली.
भारतीय संघाने दिलेल्या १८५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशसाठी लिटन दास व शांतो यांनी आक्रमक सलामी देताना ७ षटकात ६६ धावा चोपल्या. दासने केवळ २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आलेल्या पावसामुळे जवळपास अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळेचा खेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार, बांगलादेश समोर विजयासाठी १६ षटकात १५१ धावांचे आव्हान देण्यात आले.
अर्धशतक करून खेळत असलेल्या दास याला पावसानंतरच्या पहिल्याच षटकात के. एल. राहुलने थेट फेक करत धावबाद केले. त्यानंतर बांगलादेशचा डाव पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळला. शमीने शांतोला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. या स्पर्धेत आत्तापर्यंत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिलेल्या अर्शदीपने बांगलादेशचा कर्णधार शाकीब व उपकर्णधार अफीफ यांना एकाच षटकात बाद करत बांगलादेशच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. तळाच्या फलंदाजांना मोक्याच्या क्षणी मोठे फटके न खेळू देता भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १४५ धावांवर रोखत संघाला विजय मिळवून दिला. भारतासाठी अर्शदीप व हार्दिकने दोन तर शमीने एक बळी मिळवला.