चेतेश्वर पुजाराची निवृत्तीची घोषणा

Edited by: ब्‍युरो न्यूज
Published on: August 24, 2025 18:10 PM
views 25  views

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने याबद्दल माहिती दिली. तो बराच काळ भारतीय कसोटी संघातून बाहेर होता आणि आता त्याने आपल्या सुवर्ण कारकिर्दीला अलविदा म्हटले आहे.

पुजाराने 2010 मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले आणि पुढील दशकभर कसोटी संघाचा कणा म्हणून स्वतःला सिद्ध केले. तो ‘द्रविडनंतरचा भिंत’ म्हणून ओळखला जात होता. अवघड परिस्थितीत तासंतास क्रीजवर उभा राहून संघाला विजयाकडे नेण्याची कला पुजाराच्या कारकिर्दीत अनेकदा दिसून आली.

चेतेश्वर पुजाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, भारतीय जर्सी परिधान करणे, राष्ट्रगीत म्हणणे आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना संपूर्ण ताकदीनिशी खेळणे – याचा अर्थ शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. जसं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो, तसंच मीही भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

चेतेश्वर पुजाराने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर होता. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 7195 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 19 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने भारतासाठी 5 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण 51 धावा केल्या आहेत.