
सावंतवाडी : राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने मडगाव, गोवा येथील केपे तालुक्यात झालेल्या आठवी चंद्रकांत नाईक मेमोरियल राष्ट्रीय फिडे रेटिंग रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत खुल्या गटात सोळावा क्रमांक पटकावला. गोव्यासोबत इतर राज्यातील तीनशे खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. बाळकृष्णने नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट खेळ करत नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून सात गुण केले.
गोवा राज्य बुदधिबळ संघटनेचे पदाधिकारी किशोर बांदेकर, उदयोजक समीर नाईक, आंतरराष्ट्रीय पंच संजय कवळेकर, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते बाळकृष्णला रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले. बाळकृष्णने मागील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांप्रमाणेच या स्पर्धेत देखील आपले आंतरराष्ट्रीय रेटिंग वाढवले. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या मुक्ताई ॲकेडमीच्या पुष्कर केळूसकर, हर्ष राऊळ, अथर्व वेंगुर्लेकर, ब्रुंधव कोटला, पुर्वांक कोचरेकर, विघ्नेश अंबापूरकर, प्रज्वल नार्वेकर, चिदानंद रेडकर, विराज दळवी, लिएण्डर पिंटो, इत्यादी विदयार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. दुस-यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आठ वर्षीय पुर्वांकने पाच आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर आश्चर्यकारक विजय मिळवून पाच गुणांची कमाई केली. आठ वर्षीय विघ्नेश आणि हर्ष, ब्रुंधव, अथर्व या विदयार्थ्यांनी देखील आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवले. सर्व स्तरातून बाळकृष्ण आणि ॲकेडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.