
सावंतवाडी : रोटरॅक्ट रायझिंग युथ आणि रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विदयमाने बांदा येथे भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रथम क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर या स्पर्धेचा विजेता ठरला.
स्पर्धेचे उदघाटन बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, रोटरी अध्यक्ष शिवानंद भिडे, सचिव स्वप्नील धामापूरकर, रोटरॅक्ट अध्यक्ष रोहन कुबडे, सचिव डाॅ.मिताली सावंत, मुख्याध्यापक असनकर, रोटरी सदस्य यशवंत आळवे, संकेत वेंगुर्लेकर, विराज परब, रोटरॅक्ट सदस्य मनिषा खणगावकर, शिवम गावडे, नेहा निगुडकर, इत्यादि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धा जिल्हा परिषद शाळा क्र.1 च्या सभागृहात घेण्यात आली. सोळा वर्षावरील आणि सोळा वर्षाखालील अशा दोन गटात स्पर्धा खेळविण्यात आली. सावंतवाडीतील बाळकृष्ण पेडणेकर याने पाचपैकी पाच राउंड जिंकुन सोळा वर्षावरील खुल्या बुदधिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. जिल्ह्यातील अठ्ठावीस खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. बाळकृष्णला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी सुहास सातोसकर, आबा कशाळीकर, प्रवीण देसाई, इत्यादिंच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीतील रोटरी क्लबतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचा बाळकृष्ण पेडणेकर हा विजेता ठरला होता.
बाळकृष्ण हा सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचा मुलगा आहे. रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट यांच्या माध्यमातून बुदधिबळ खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबददल कौस्तुभ पेडणेकर यांनी समाधान व्यक्त केले. सर्व स्तरातून बाळकृष्णचे अभिनंदन करण्यात येत आहे.