सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनसह महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक खेळ २०२२-२३ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि व्यासपीठ निर्माण होईल. घेण्यात येणाऱ्या विविध खेळांमध्ये नेमबाजी या खेळाचाही समावेश करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयुष दत्तप्रसाद पाटणकर (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) याची निवड १० मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारासाठी झाली आहे. या प्रकारात एकूण ४९ पुरुष व ३६ महिला असे एकूण ८५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा बालेवाडी, पुणे येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात येईल.
यापूर्वी आयुषने भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये ६०० पैकी ५६३ गुण मिळवून भारतीय निवड चाचणीसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. याच निकषावर त्याची महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आयुष हा उपरकर शूटिंग अकॅडेमीमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असून त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे.
सदरच्या निवडीबद्दल आयुषचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आयुष हा सावंतवाडीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक दत्तप्रसाद पाटणकर यांचा चिरंजीव असून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे पीआरओ सतीश पाटणकर यांचा नातू आहे.